मागेल त्याला काम देण्याची प्रशासनाची तयारी, कन्नड तालुक्याला सर्वात कमी कामे

Foto

औरंगाबाद- दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात विविध प्रकारची कामे व कामांचे नियोजन पूर्ण झाले असून येत्या आठवडाभरात तब्बल 49 हजार नवीन प्रकारची कामे उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नुकतीच बैठक घेतली होती.

 

यावर्षी दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता रब्बी हंगामात  काम मिळणार नाही. त्यामुळे या महिन्यापासूनच ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन प्रशासनाने केले आहे. त्यानुसार येत्या आठवड्याभरात तब्बल 49 हजार कामे उपलब्ध करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. ग्रामीण भागातील हातांना काम मिळवण्यासाठी प्रत्येक तालुक्‍यात या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. वैजापूर तालुक्यात सर्वाधिक 25 हजार 69 कामे नियोजनात आहे. त्यानंतर गंगापूर 6 हजार 371, औरंगाबाद 2,949 खुलताबाद 3,636 सिल्लोड 3,122 पैठण 2,590 कन्नड 1,468 अशी कामे तालुकानिहाय  ठेवण्यात आली आहेत.

 

कन्नड तालुक्यात सर्वात कमी कामे

 

जिल्ह्यात सर्वाधिक कामांचे नियोजन वैजापूर तालुक्यात करण्यात आले आहे. या तालुक्यात 23,129 कामांचे नियोजन करण्यात आले आहे. तर इतर यंत्रणांमार्फत 1,940 कामे करण्यात येणार आहेत. त्याखालोखाल गंगापुर तालुक्यात 5 हजार 950 कामे होणार आहेत. तर इतर यंत्रणांमार्फत 421 कामे करण्यात येतील. सर्वात कमी कामांचे नियोजन कन्नड तालुक्यात करण्यात आले आहे. तालुक्यात  1 हजार 468 कामाचे नियोजन करण्यात आले असून इतर यंत्रणांमार्फत 207 कामे केली जाणार आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर काम उपलब्ध करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र या तालुक्यात अजूनही समाधानकारक कामे उपलब्ध नसल्याचे दिसून येते.